राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : तांदुळवाडी (ता. राहुरी) येथील नवयुग कॉलनी गावठाण परिसरात हिंदू स्मशानभूमी तसेच मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी देण्यात आलेला बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा तहसील प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य निसारभाई सय्यद, सौ. शितल भैय्यासाहेब आढाव यांच्यासह नवयुग कॉलनी गावठाण प्रभागातील नागरिकांनी स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी २२ जून रोजी दिलेल्या पत्रात नवयुग कॉलनी गावठाणासाठी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनविधीसाठी मौजे तांदुळवाडी येथील गट क्रमांक ६८२/२ मधील शासकीय जमीन मंजूर करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे नमूद केले आहे. प्रस्तावातील काही त्रुटींची पूर्तता करून फेरअहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी, राहुरी यांना आवश्यक त्रुटींची पूर्तता करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त होताच नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक प्रयत्न सुरू असल्याने नागरिकांनी आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंब करू नये, अशी विनंती तहसीलदारांनी केली आहे. तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि मंडळ अधिकाऱ्यांनाही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसील प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ग्रामपंचायत सदस्य निसारभाई सय्यद, सौ. शितल आढाव आणि अन्य नागरिकांनी नियोजित उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मशानभूमी व दफनभूमीसाठी स्वतंत्र जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गट क्रमांक ६८२/२ चा प्रस्ताव प्रक्रियेत
नवयुग कॉलनी गावठाणासाठी स्मशानभूमी व दफनभूमीच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव सध्या प्रशासकीय प्रक्रियेत असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.