श्रीरामपूर : मोहरम व इतर आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने मंगळवारी (ता. २३) शहरात जोरदार पथसंचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह वार्ड क्रमांक २ आणि गोंधवणी रोड परिसरात हे पथसंचलन पार पडले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह सुमारे ९० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पथसंचलनाद्वारे पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करताना समाजकंटकांना कायद्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. आगामी सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.