स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ उभारली जाणार ‘स्व.अरुणकाका साहित्य नगरी’

अहिल्यानगर (प्रतिनिधी):

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १७ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन येत्या २३ व २४ मे रोजी जाधव लॉन्स, नगर-कल्याण रोड, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडणार असून, यंदाच्या संमेलनस्थळास पहिल्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटक तथा माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ ‘स्व. अरुणकाका साहित्य नगरी’ असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी दिली.या संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्व. अरुणकाका जगताप यांच्या साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा देत हा निर्णय एकमताने घेतला.शब्दगंध साहित्य संमेलनाच्या पहिल्या पर्वात स्व. अरुणकाका जगताप यांनी विशेष आत्मीयतेने सहभाग घेतला होता. कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुधाताई कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले होते. चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या समवेत दिवसभर साहित्यिकांमध्ये रमून त्यांनी साहित्यिक चळवळीबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले होते.त्यानंतरही शब्दगंध साहित्य संमेलनाबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते. संमेलनाची माहिती ते सातत्याने जाणून घेत असत. पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात पार पडले होते. त्यावेळीही स्व. अरुणकाका यांनी साहित्यिकांशी मनमोकळा संवाद साधला होता.याच साहित्यप्रेमी आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने यंदाच्या संमेलनस्थळास ‘स्व. अरुणकाका साहित्य नगरी’ हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या बैठकीस संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, उपाध्यक्ष डॉ. जी. पी. ढाकणे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत, भारत गाडेकर, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा. डॉ. अनिल गर्जे, शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, राजेंद्र पवार, मकरंद घोडके, प्रशांत सूर्यवंशी, हर्षल आगळे, राजेंद्र चोभे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, प्रा. डॉ. संदीप सांगळे हे यंदाच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असून महाराष्ट्रभरातील नामवंत तसेच नवोदित साहित्यिकांचा सहभाग या संमेलनात अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *