प्रसादनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची पल्लवी ढूस यांची मागणी

देवळाली प्रवरा : प्रभाग क्रमांक ७ मधील प्रसादनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार हेमंती ओगले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी देवळाली प्रवरा येथे भव्य स्मारक उभारणे आवश्यक आहे.सध्या शहरात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला साजेसे मध्यवर्ती स्मारक नसल्याने विद्यार्थी, अभ्यासक आणि नागरिकांना त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रसादनगर येथे असलेला अर्धाकृती पुतळा कमी जागेत असल्याने तेथे भव्य स्मारक उभारणीस अडचणी येत असल्याचेही ढूस यांनी सांगितले.स्मारकासाठी उपलब्ध शासकीय जागा मंजूर करावी, स्मारकात वाचनालय, अभ्यासिका, डिजिटल संग्रहालय आणि सभागृहाचा समावेश करावा, देखभालीसाठी स्वतंत्र समिती नेमावी तसेच दरवर्षी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर रोजी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.या स्मारकामुळे सामाजिक सलोखा वाढून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास पल्लवी वैभव ढूस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *