राहुरीच्या सुकन्याची राज्यात भरारी! डॉ. मयुरी खेवरे यांचा पदव्युत्तर परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : मातृत्वाची जबाबदारी, सहा महिन्यांच्या बाळाचे संगोपन आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा कठीण प्रवास अशा आव्हानांवर मात करत मूळच्या राहुरीच्या आणि सध्या सांगली येथे कार्यरत असलेल्या डॉ. मयुरी भाऊसाहेब खेवरे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS), नाशिक येथील प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynaecology) विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. मयुरी यांच्या या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे, परीक्षेच्या काळात त्यांचा मुलगा पद्मराज अवघ्या सहा महिन्यांचा होता. एका बाजूला बाळाचे संगोपन, मातृत्वाची जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्ये, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षणाचा कठोर अभ्यास आणि परीक्षेची तयारी, अशा दुहेरी आघाडीवर त्यांनी समर्थपणे बाजी मारली. सातत्यपूर्ण अभ्यास, प्रचंड मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
आपल्या यशाविषयी भावना व्यक्त करताना डॉ. मयुरी खेवरे यांनी गुरुजनांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि पती योगेश सुंबे यांचा मोलाचा पाठिंबा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आई, पत्नी आणि डॉक्टर म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मिळालेले हे यश आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रवासात पती योगेश सुंबे आणि मुलगा पद्मराज यांच्यामुळे मिळालेली प्रेरणा आपल्यासाठी महत्त्वाची ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय क्षेत्रात भविष्यातही उत्कृष्ट कार्य करून समाजाची सेवा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. डॉ. मयुरी खेवरे या शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खेवरे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मातृत्वाची जबाबदारी सांभाळतानाच ध्येयाप्रती असलेली निष्ठा, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे डॉ. मयुरी यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. त्यांचे हे यश वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह अनेक तरुणी आणि मातांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *