जुळणी न झालेले मतदार अन् विसंगतीची प्रकरणे तातडीने निकाली काढा – सुनील गाढे

राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील जुळणी न झालेले तसेच तार्किकदृष्ट्या विसंगती असलेल्या मतदारांकडून कागदपत्रे प्राप्त करून त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाला अधिक वेग देऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिल्या.
तहसील कार्यालय, राहुरी येथे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत ३३.८३ लाख मतदार आहेत. यापैकी १ लाख ३२ हजार ८३३ मतदारांची जुळणी झालेली नाही, तर १ लाख ५९ हजार ६१९ मतदार तार्किकदृष्ट्या विसंगती असलेले आहेत. अशा एकूण २ लाख ९२ हजार ४५२ मतदारांकडून बीएलओमार्फत कागदपत्रे प्राप्त करून घेऊन त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात १७ हजार ८८५ जुळणी न झालेले, तर १८ हजार ९७९ तार्किकदृष्ट्या विसंगती असलेले, असे एकूण ३६ हजार ८६४ मतदार आहेत. यापैकी तब्बल २२ हजार १५६ मतदारांपर्यंत बीएलओ अद्याप पोहोचलेले नसल्याचे बैठकीत समोर आले.
यामुळे गाढे यांनी राहुरी तालुक्यातील कामासाठी नियुक्त ३७ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. काही बीएलओंनी अद्याप काम सुरू केले नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित बीएलओंनी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
सूचना देऊनही काम सुरू न करणाऱ्या बीएलओंविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे मतदार नोंदणी अधिकारी अनुप यादव यांनी सांगितले. तसेच कामात मागे असलेल्या काही बीएलओंना गाढे यांनी बैठकीदरम्यान थेट फोन करून कामात प्रगती करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
बैठकीत जुळणी न झालेले व तार्किकदृष्ट्या विसंगती असलेल्या मतदारांबाबत करावयाच्या कार्यवाहीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय नवोदित मतदार नोंदणी तसेच नमुना ६, ७ व ८ वरील प्रकरणांवर मुदतीत कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीस मतदार नोंदणी अधिकारी अनुप यादव, तहसीलदार डॉ. अमित पवार, निवडणूक नायब तहसीलदार अनिल बडे, विशाल सदनापूर, अभिजित रायकवाड, अनिल टेमक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *