राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : येथील विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची उत्तर भारत अभ्यास सहल नुकतीच उत्साहात पार पडली. पुस्तकातील शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक स्थळांची माहिती मिळावी, या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी चंदीगड येथील रॉक गार्डन, रोझ गार्डन व चंडी माता मंदिरास भेट दिली. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेल्या कलाकृतींची पाहणी करताना विद्यार्थ्यांना कल्पकतेचा अनोखा अनुभव मिळाला. जालंधर येथील पुष्पा गुजराल सायन्स सिटीमध्ये विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला.
अमृतसर येथील श्री हरमंदिर साहिब (सुवर्णमंदिर) येथे विद्यार्थ्यांनी सेवा व अध्यात्माचा अनुभव घेतला. तसेच जालियनवाला बाग स्मारकास भेट देऊन स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. वाघा-अटारी सीमेवर भारतीय जवानांचे ‘बीटिंग रिट्रीट’ संचलन पाहताना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव मनोजशेठ बिहाणी, सहसचिव अनुपशेठ बिहाणी व प्रभारी मुख्याध्यापक राहुल जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक योगेंद्र रेलकर, सतीश बोस्टे, मनोजकुमार जाधव, संजय भडके, गजानन बडाख, नंदू बोरुडे, अभिषेक नवाळे, सुनिता शेळके व सुरेखा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शिस्तीची जबाबदारी पार पाडली. अनुभवातून शिक्षण देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.