कोपरगाव –
अवैध वाळू वाहतुकीविरोधात कोपरगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मायगाव देवी परिसरात छापा टाकून पोलिसांनी जेसीबी आणि डंपरसह तब्बल 20 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले होते.
त्यानुसार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मायगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अवैध वाळूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळू भरताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
पोलिसांनी जेसीबी क्रमांक एमएच १७ डीजे ४५८० आणि डंपर क्रमांक एमएच १२ एसएक्स २३१३, तसेच सुमारे ६ ब्रास वाळू, असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत किशोर देवीदास धोत्रे, वय २६, रा. मायगाव देवी आणि सुरेश सुकदेव सोनवणे, वय ३८, रा. शिंगणापूर यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भा.न्या.संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ३ आणि १५ अन्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.