मांजरी, ता. राहुरी : नेवासा व राहुरी तालुक्यातील जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा नदीवरील चारही बंधारे मुळा धरणाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार मुळा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर डिग्रस, मानोरी, मांजरी आणि वांजुळपोई हे चारही बंधारे भरून देण्यात आले.
मांजरी येथे शनिवारी (दि. ४) सकाळी ९ वाजता बालब्रह्मचारी प्रकाश महाराज सैंदोरे यांच्या हस्ते मुळाथडी पाणी आरक्षण कृती समिती, शेतकरी, ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुळा नदीचे विधिवत जलपूजन करण्यात आले. चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी मांजरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कोंडीराम विटनोर, भारत विटनोर, ग्रामपंचायत सदस्य तुषार विटनोर, गोरक्षनाथ विटनोर, तुकाराम विटनोर, राऊसाहेब विटनोर, बाबासाहेब विटनोर, पांडुरंग जंगले तसेच मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, कार्याध्यक्ष नानासाहेब जुंधारे, खजिनदार विलास सैंदोरे, संघटक किरण जाधव, सहसचिव विठ्ठल जाधव, सचिव बाळासाहेब नवगिरे यांच्यासह समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुळा नदीवरील बंधारे भरण्याची प्रक्रिया गेल्या १२ वर्षांपासून राबविली जात आहे. ऐन दुष्काळात चारही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बंधारे भरण्यासाठी कायमस्वरूपी हक्काचे पाणी आरक्षित करण्यासाठी आता निर्णायक लढा उभारणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप, उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, विलास सैंदोरे व किरण जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, मुळा नदीवरील चारही बंधारे भरून दिल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अक्षय कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे व हेमंत ओगले यांचा मांजरी बंधाऱ्यावर विधिवत जलपूजन करून भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष नानासाहेब जुंधारे, किरण जाधव, भारत विटनोर व तुषार विटनोर यांनी सांगितले.