पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे आयोजित बैलपोळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर
ढोल-ताशांचा गजर, आकर्षक सजविलेल्या बैलजोड्या, पारंपरिक वेशभूषा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अशा वातावरणात पारनेर शहरात नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या वतीने भव्य बैलपोळा महोत्सव उत्साहात पार पडला. मात्र, या महोत्सवातील मिरवणुकीदरम्यान समर्थकांकडून देण्यात आलेल्या ‘भावी नगराध्यक्ष… युवराज पठारे!’ या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणांमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
पारनेर शहरात रविवारी सायंकाळी बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून त्यांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य बैलजोडी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नागरिकांसह विशेषतः युवकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध बैलगाडा शर्यती व प्रदर्शनांमध्ये तब्बल ३६ वेळा प्रथम क्रमांक पटकावलेली विशेष बैलजोडी ठरली. २२ महिन्यांची आणि दोन दाती असलेल्या या बैलजोडीची किंमत ६ लाख ५१ हजार रुपये असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान युवक आणि समर्थकांकडून नगरसेवक युवराज पठारे यांच्या समर्थनार्थ ‘भावी नगराध्यक्ष’च्या घोषणा देण्यात आल्या. आगामी नगरपंचायत निवडणुकीची राजकीय समीकरणे आकार घेत असतानाच या घोषणांनी पठारे यांच्या नावाभोवती राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी नगरसेवक युवराज पठारे यांनी आगामी राजकीय नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना, “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येणाऱ्या काळात पारनेर शहराला मिळेल. आम्हीच येथे कायम आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कुंडलिक पठारे, युवा नेते मंगेश दाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारेदत्तानाना पवार, मनोज मुंगसे, अर्जुन भालेकर, योगेश मते, विकास रोकडे, सुभाष सासवडे, सतीश पिंपरकर, दत्ता दिवटे, निवृत्ती वरखडे, किरण कोकाटे, ऋषिकेश गंधाडे, यशवंत पठारे, प्रवीण पठारे, प्रदीप नगरे, प्रसाद कर्णावट आदी उपस्थित होते.