मुळा धरणातून बंधाऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे विखे पाटील यांचे निर्देश

उद्या सकाळी ९ वाजता नदीपात्रात पाणी सोडणार; सुमारे ५०० एमसीएफटी पाण्याचा विसर्ग

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यानुसार शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मुळा धरणातून बंधाऱ्यांसाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने हा निर्णय घेतला. मुळा धरणातून सुमारे ५०० एमसीएफटी (अर्धा टीएमसी) पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या पाण्याचा डिग्रस, मानोरी, मांजरी आणि वांजुळपोई येथील बंधाऱ्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत मुळा नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, नदीपात्रात पाणी सोडताना दोन्ही तीरावरील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात येणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळाच्या काळात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकरी वर्गातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत होत असून, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *