राहुरी : आदिवासी संघर्ष सेनेचे कार्यकर्ते करण विलास जाधव यांना पोलिसांकडून अपशब्द वापरून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आदिवासी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (१ ऑक्टोबर) राहुरी पोलिसांना व तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास करण विलास विलास जाधव व त्यांच्यासोबत चार ते पाच जण चारचाकी वाहनातून डिग्रस मार्गे कनगर येथे जात होते. या वेळी रस्त्यात त्यांचे वाहन बंद पडले. त्यावेळी पोलिस हवालदार गणेश सानप तेथे आले. त्यांनी संबंधितांकडे त्यांची माहिती विचारली असता, आपण कनगर गावचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर पोलिस हवालदार सानप यांनी कार्यकर्त्यांना अपशब्द वापरले तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास ५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर नामदेव पवार,राजेंद्र ठाकर, विजय सूर्यवंशी, शंकर माळी, अरुण जाधव, कार्तिक माळी, सागर माळी, अरुण बर्डे, किरण गायकवाड, किरण बर्डे, विकी माळी, नानासाहेब पवार आदींच्या सह्या आहेत.