गोवर्धन माळी सरांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

वळण, ता. राहुरी : श्री गाडगे महाराज आश्रम शाळा, वळण येथील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गोवर्धन जनार्दन माळी यांनी ३५ वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

आश्रमशाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशनचे खजिनदार तथा आश्रमशाळेचे संचालक अशोकदादा पाटील होते. संस्थेचे चेअरमन मधुसूदन मोहिते-पाटील, सचिव विष्णूभाऊ नाचवणे, सचिव डॉ. सचिन भाऊ घोंगटे, खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे, माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच संस्थेचे माजी उपाध्यक्ष, आदिवासी सेवक व दलित मित्र स्वर्गीय खांडवे अण्णा यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, ज्ञानदेव महाकाळ, डॉ. सचिन घोंगटे, माळी सरांच्या कन्या वृशाली मापारी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मकासरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. वक्त्यांनी माळी सरांच्या ३५ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करत सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षण क्षेत्राशी असलेले नाते कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माळी सरांनी व्यक्त केली कृतज्ञता

सत्काराला उत्तर देताना गोवर्धन माळी यांनी आपल्या शैक्षणिक व सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. आजोबा मुख्याध्यापक, तर वडील व चुलते शिक्षक असल्याने घरातूनच शिक्षणाचे संस्कार मिळाले. त्यातूनच डी.एड. करून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेत प्रवेश मिळवून देण्यासाठी स्वर्गीय प्रल्हादराव पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

३५ वर्षांच्या सेवाकाळात संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी ऋण व्यक्त केले.

यावेळी माळी सरांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना खुर्ची भेट देत विशेष सन्मान केला. चेअरमन मधुसूदन मोहिते यांना ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ मिळाल्याबद्दल तसेच डॉ. सचिन घोंगटे यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश पगारे यांनी केले, तर ढोकणे आप्पासाहेब यांनी निवेदन केले.

३५ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गोवर्धन माळी सरांच्या कार्याला या सेवापूर्ती सोहळ्यातून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *