गंगापूर शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; आठ जण ताब्यात

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे: गंगापूर (ता. राहुरी) येथील एस. के. पेपर मिल कंपनीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह पाच मोबाईल व पाच दुचाकी असा एकूण ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आतार व विशाल तनपुरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.

सोमवारी (७ सप्टेंबर) हे पथक राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, गंगापूर शिवारातील एस. के. पेपर मिलसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये रामदास नान्नोर हा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचांसमक्ष ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. त्यानंतर पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर पुंजा पवार (३४, रा. कोल्हार खुर्द), अनिल दत्तात्रय होडगर (२९, रा. पिंपळगाव फुणगी), चिमा खंडू वडीतके (४५, रा. गंगापूर), बाळासाहेब विठ्ठल तुपे (६०, रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर), मनोहर रामदास नान्नोर (३८, रा. गंगापूर), किरण साहेबराव होण (३६, रा. कडित, ता. श्रीरामपूर), विठ्ठल बाळासाहेब चितळकर (३८, रा. मांडवे) आणि रामदास रावजी नान्नोर (६८, रा. गंगापूर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी अंगझडती घेतली असता ४ हजार ७१० रुपये रोख, ९० हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास व कारवाई राहुरी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *