डीएसपी चौकातील कोंडी सुटणार; उड्डाणपुलासाठी ६५ कोटींचा निधी मंजूर

अहिल्यानगर : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता गती मिळणार आहे.

कोपरगाव-शिर्डी-कोल्हार-अहिल्यानगर या प्रमुख मार्गावरील डीएसपी चौक हा शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. संभाजीनगरकडून येणारी वाहने तसेच शिर्डी, कोपरगाव, कोल्हार आणि शहरातील विविध भागांकडे जाणारी वाहतूक या चौकातून मोठ्या प्रमाणात होते. वाहनांची संख्या वाढल्याने सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते.

शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन डीएसपी चौकातील कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. त्यातून उड्डाणपुलाच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर चौकातील मुख्य वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शिर्डी, कोपरगाव, कोल्हार तसेच शहरातील विविध भागांकडे जाणारी वाहने अधिक सुरळीतपणे मार्गस्थ होऊ शकतील. परिणामी वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवासाचा वेळ, इंधन आणि श्रमाची बचत होण्याची अपेक्षा आहे. रुग्णवाहिका, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी आणि शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

अहिल्यानगर शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा विचार करता हा उड्डाणपूल केवळ सध्याच्या कोंडीवरचा उपाय नसून पुढील अनेक वर्षांसाठी शहराच्या वाहतूक व्यवस्थेला सक्षम करणारा महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. शासनाच्या या निर्णयामुळे अहिल्यानगरच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *