शेतकरी नेते रवींद्र मोरे यांची मुळा डाव्या कालव्यातून दोन आवर्तनांची मागणी

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी आरक्षित करा; रवींद्र मोरे यांचे सायली पाटील यांना निवेदन

अहिल्यानगर प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतीचे आणि पिकांचे नियोजन करण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून दोन आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामासाठी मुळा डाव्या कालव्यातून आजपर्यंत अंदाजे ७०० दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे. तर मुळा उजव्या कालव्यातून सुमारे ८ हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले असावे. डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी काळातील शेती व पिकांचे नियोजन करण्यासाठी आणखी दोन आवर्तनांची आवश्यकता आहे. यासाठी अंदाजे १३०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे.

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आरक्षित करून मुळा डाव्या कालव्यातून दोन आवर्तने मंजूर करावीत, अशी विनंती मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी रवींद्र मोरे यांच्यासह दिलीप इंगळे, जितेंद्र इंगळे, सुनील आढाव आणि महेश जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *