कोल्हारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर फाडणारे दोघे अटकेत !

श्रीरामपूर शहर पोलिसांची तातडीने कारवाई; दुसऱ्या गुन्ह्याचीही आरोपींची कबुली

श्रीरामपूर दिनांक 19 ऑक्टोबर 2026 – कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर फाडून नुकसान केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आदित्य शिवाजी गवारे (वय १९, रा. शिरसगाव) आणि गौरव सरुनाथ वडितके (वय २२, रा. गळनिंब), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

१८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हार बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरवर दगडफेक करून तो फाडण्यात आल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातील ९ हजार रुपये किमतीचे पेट्रोल इंजिनही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब कोळपे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *