शब्दगंधच्या फिरत्या मोफत वाचनालय उपक्रमांतर्गत लोहोगाव येथे सामूहिक वाचन
नेवासा : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थी पुस्तक वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी त्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून पुस्तकांशी मैत्री करावी, असे आवाहन प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, नेवासा तालुका शाखेच्या वतीने ‘फिरते मोफत वाचनालय’ उपक्रमांतर्गत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, लोहोगाव येथे ‘शब्दगंध सामूहिक वाचन उपक्रम’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी शिक्षक प्रल्हाद धाडगे होते.