आरोग्य शिबिराला प्रतिसाद; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठांना ब्लँकेट वाटप, मुलींच्या बालगृहात वृक्षारोपण
राहुरी (प्रतिनिधी, शरद पाचारणे ) : लोकनेते स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तांदुळवाडी येथे विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करून त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. यानिमित्त सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कृपा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप आणि शासकीय मुलींच्या बालगृहात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास राहुरीचे तहसीलदार डॉ. अमित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाले की, स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले हे जिल्ह्याचे नेते होते. त्यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांसाठी दिवस-रात्र काम केले. सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पत्रकार विनीत धसाळ म्हणाले की, राहुरी तालुक्याच्या इतिहासात स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. त्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना पुढे जाण्याची संधी दिली. संघर्षमय वाटचालीतून यश कसे मिळवायचे, याचा आदर्श त्यांनी समाजासमोर निर्माण केला. त्यांच्या कार्याचा वारसा जपणे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे धसाळ यांनी सांगितले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, ह.भ.प. महेश महाराज खाटेकर आदींनी मनोगत व्यक्त करून स्व.कर्डिले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमादरम्यान आयोजित सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कृपा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शासकीय मुलींच्या बालगृह परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, माजी चेअरमन बाळासाहेब धसाळ, ह.भ.प. महेश महाराज खाटेकर, मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे, माजी संचालक शरदराव पेरणे, लक्ष्मण पेरणे, कानिफनाथ धसाळ, सुखदेव खाटेकर, शिवाजी खडके, मच्छिंद्र चव्हाण, प्रभाकर धसाळ, एकनाथ खाटेकर, तात्यासाहेब धागुडे, अशोक तोडमल, भैय्यासाहेब आढाव, अविनाश पेरणे, स्वप्निल पेरणे, प्रमोद खडके, मुख्याध्यापिका संगीता बेदरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेणुका रूपटक्के, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती धसाळ, सौ. सुनीता धसाळ, मारुती शिंदे, मल्हारी लोखंडे, मच्छिंद्र लोखंडे, आप्पा लोखंडे, अक्षय लोखंडे, शंकर लष्करे, कासिम शेख, नितीन मकासरे, शरद खेडेकर, रामचंद्र धागुडे, उत्तम खाटेकर, संतोष पवार, किरण गायकवाड, सिद्धार्थ पेरणे, जगन्नाथ धसाळ, लालखान शेख, उद्धव धसाळ, नितीन निकम, आत्माराम धसाळ, कांतीलाल डुक्रे, बबन डुक्रे, रावसाहेब खडके, अनिल गायकवाड, अक्षय निकम, संदीप चव्हाण, विजय तोडमल आदींसह गावातील मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रा.पं.सदस्या सौ.स्वाती विनीत धसाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले मित्र मंडळ तांदुळवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.