हरिमाळा येथे युनिटी मित्र मंडळाच्या आरतीला आमदार अक्षय कर्डिले यांची उपस्थिती!

“हरिमाळा परिसराशी असलेले प्रेम कायम ठेवणार, नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार” — आमदार अक्षय कर्डिले

अहिल्यानगर : नवरात्रोत्सवानिमित्त हरिमाळा येथील युनिटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरतीला आमदार अक्षयदादा कर्डिले उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार अक्षय कर्डिले म्हणाले, “गेल्या सलग पाच वर्षांपासून मी या नवरात्रोत्सवात सहभागी होत आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनीही हरिमाळा परिसराशी असलेले प्रेम आणि जिव्हाळा कधी कमी होऊ दिला नाही. त्याचप्रमाणे मीदेखील हा जिव्हाळा कायम ठेवणार आहे. हरिमाळा परिसरातील नागरिकांच्या ज्या अपेक्षा आणि मागण्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथे आल्यानंतर मला माझ्या घरातील सदस्यांमध्ये आल्यासारखे वाटते,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी आणि नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला. दिवाळीपर्यंत चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी करत पाऊस झाल्यास अनेक अडचणी दूर होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आकाश कुडिया यांनीही नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. नवरात्र हा भक्ती, शक्ती, श्रद्धा आणि एकतेचा उत्सव असून, अशा उत्सवांमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होतो. युनिटी मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला दरेवाडीचे सरपंच अनिलजी करांडे, आकाश कुडिया, राजू चव्हाण, राजेश चव्हाण, महेंद्र चव्हाण, राहुल गोहेर, जीत चव्हाण, सनी चव्हाण, आतिश गोहेर, अक्षय कुडिया, करण कोडिया, रितिक चव्हाण, पियुष चव्हाण, अनु चव्हाण, विजेंद्र गोहेर यांच्यासह युनिटी मित्र मंडळाचे सदस्य आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या आरती सोहळ्यातून भक्तीभावासोबतच सामाजिक एकता आणि परिसरातील जिव्हाळ्याचे दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *