राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी तालुक्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत राहुरी खुर्द व म्हैसगाव येथे दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून सुमारे १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध अजिनाथ पाखरे यांच्या सरकारी फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन ऊर्फ पृथ्वीराज दगडूसिंग गिरासे, रा. राहुरी खुर्द, हा आपल्या राहत्या घरात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानुसार पथकाने राहुरी खुर्द येथे छापा टाकून हिरा पानमसाला व रॉयल तंबाखूसह एकूण १ लाख ४७ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, म्हैसगाव येथील मातोश्री सुपर मार्केटमध्ये छापा टाकला. यावेळी बाबासाहेब भाऊराव गागरे, रा. गागरे मळा, म्हैसगाव याच्या ताब्यातून हिरा पानमसाला, विमल पानमसाला तसेच विविध प्रकारची सुगंधी तंबाखू असा सुमारे २६ हजार ४९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणातील मुद्देमाल हा पवन गिरासे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती कारवाईदरम्यान समोर आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही धडक कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुनील विनायक पवार, पोलीस हवालदार शाहीद सलीम शेख, अजिनाथ पाखरे ,पोलीस नाईक भिमराज किसन खसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमृत शिवाजी आढाव यांनी सहभाग घेतला.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच इतर संबंधित कलमांन्वये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.