अहिल्यानगर : जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. सोनई व बेलवंडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे टाकून ८९ हजार ३६६ रुपये किमतीचा गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाईत आठ जणांविरुद्ध पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी (२७) सोनई व बेलवंडी परिसरात दोन पथकांनी कारवाई केली.
सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन कारवायांमध्ये अनुक्रमे १३ हजार २६० व २० हजार २४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शब्बीर महेताब सय्यद (वय ४५, रा. सोनई) व जावेद उस्मान शेख (वय ५२, रा. हलवाई गल्ली, सोनई) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये अनुक्रमे ५ हजार ३८, १६ हजार ४०० आणि ३४ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणांत सोमनाथ उर्फ गणेश प्रकाश घोरपडे वय 35, रा.चिंभळा, ता.श्रीगोंदा , संकेत अशोक पाचपुते ,रा.काष्टी, ता.श्रीगोंदा (फरार) , विजय सतीष चोरडिया वय 33, रा.चिंभळा, ता.श्रीगोंदा, कमलेश मुरली कृपालीनी रा.दौंड, जि.पुणे (फरार) , जाकीर इसाक शेख वय 39, रा.बेलवंडी, ता.श्रीगोंदा व फयाज तांबोळी रा.अहिल्यानगर (फरार) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्व प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, अतुल लोटके, विकास साळवे, सतीष भवर, गणेश लोंढे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, शामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे व अमोल कोतकर यांच्या पथकाने केली.