अहिल्यानगर वेब प्रतिनिधी शरद पाचारणे :
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा व सुगंधी तंबाखूच्या व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल 23 लाख 29 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, अतुल लोटके, रमीझराजा आतार, सागर ससाणे, रणजीत जाधव, बिरप्पा करमल, विकास साळवे, दीपक जाधव, अमृत आढाव, निळकंठ कारखिले आणि भगवान सानप यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
एमआयडीसी व शहर परिसरात अवैध मावा व सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांची माहिती गोळा केली.
गुरुवारी (दि. ६) पथकाने पंचांसमक्ष एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मावा, सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शुभम दत्तात्रय हजारे (रा. सरोदेमळा, केडगाव) व जितू मालपाणी (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 18 लाख 15 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तोफखाना पोलीस ठाण्यातील दुसऱ्या गुन्ह्यात आदित्य अरुण सुतार, प्रमोद शरद गायकवाड, गणेश बाळासाहेब कोलते (सर्व रा. बोल्हेगाव) यांच्यासह कय्युम अयुब शेख (फरार) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या गुन्ह्यात अक्षय कुंडलीक निकाळजे (रा. बोल्हेगाव) व अस्लम शेख (रा. माळीवाडा, फरार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 1 लाख 4 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध मावा व सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.