राहुरी कॉलेजला एसटी बसेसचा नियमित थांबा देण्याच्या आ.प्राजक्त तनपूरेच्या सूचना 

राहुरी प्रतिनिधी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे :

राहुरी येथील स्व. रामदास पा. धुमाळ कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (राहुरी कॉलेज) येथे अहिल्यानगर विभागाच्या एसटी बसेसचा अधिकृत बसथांबा असतानाही अनेक बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी प्रतिनिधींची राहुरी कॉलेज येथे बैठक घेण्यात आली.

राहुरी कॉलेज हा अधिकृत बसथांबा असल्याने अहिल्यानगर विभागाच्या सर्व बसेसनी येथे नियमित थांबणे अपेक्षित आहे. मात्र, काही बसेस येथे थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. तसेच राहुरी बसस्थानकातून काही वाहकांकडून राहुरी कॉलेजपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.

बैठकीत विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. राहुरी कॉलेज येथे सर्व एसटी बसेसना नियमित थांबा देण्यात यावा, तसेच अधिकृत बसथांबा असल्याचा फलक तातडीने लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.

अधिकृत बसथांबा असूनही बसेस न थांबविणाऱ्या चालक व वाहकांवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना सुरळीत आणि नियमित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.

विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *