आ. अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याने वांबोरी चारी टप्पा दोनला गती; १२ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार

अहिल्यानगर वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला आता गती देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १२ गावांतील ३२ तलावांना पाणी मिळणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पांढरीपूल येथे वांबोरी चारीच्या कामाची पाहणी करून आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मुळा धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाला असून, लवकरच वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार कर्डिले यांनी सांगितले. त्यामुळे वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार कर्डिले म्हणाले, ‘‘वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाकडे माझे विशेष लक्ष आहे. या टप्प्यात राहुरी, नगर आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील १२ गावांतील ३२ तलावांचा समावेश आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविणे, हे माझे प्राधान्य आहे.’’
स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी योजनेसाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कामादरम्यान निधी, प्रशासकीय मंजुरी अथवा अन्य कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वांबोरी चारीचे पाणी मिळाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा आधार मिळणार आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
‘‘शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविणे हा केवळ विकासाचा विषय नसून त्यांच्या जीवनमानाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे वांबोरी चारी टप्पा दोनचे काम कोणत्याही परिस्थितीत रखडू देणार नाही. १२ गावांतील ३२ तलावांमध्ये लवकरात लवकर पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू,’’ असे आ. कर्डिले यांनी सांगितले.
चौकट
शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने पाऊल
वांबोरी चारी टप्पा दोनचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविणे, हे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांचे फलित आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद, बहरणारी शेती आणि पाण्यामुळे समृद्ध होणारी गावे हीच स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *