राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या दक्षिण नगर जिल्हा सरचिटणीसपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश प्रभाकर बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणारी आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली राज्यातील महत्त्वाची संघटना म्हणून ओळखली जाते. प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातही संघटनेचे काम गतिमान झाले असून, विविध तालुक्यांतील पत्रकारांना संघटनेशी जोडून संघटन बळकट करण्याचे काम सुरू आहे.
दक्षिण नगर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश प्रभाकर बोरुडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेली चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि लोकहिताच्या विषयांवर प्रभावी लेखन केले आहे. अन्याय-अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे डॉ. आरोटे यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.
तालुक्यातील पत्रकार संघटनांमध्ये यापूर्वी विविध पदांवर काम केल्यामुळे श्री. बोरुडे यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा निश्चितच संघटनेला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, श्री. बोरुडे यांच्या निवडीबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे तसेच उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.