राहुरीच्या रावसाहेब पवारांचा दिल्लीत सन्मान; ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान

राहुरी, वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : ग्रामीण भागातील शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब नामदेव पवार यांना नवी दिल्ली येथे ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पवार यांनी शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवांकुर विद्यालय (कोंढवड), शिवांकुर रेनबो स्कूल (राहुरी) तसेच शिवांकुर विस्डम स्कूल (खडांबे) या शैक्षणिक संस्था सुरू केल्या. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात मराठी माध्यमासोबत सेमी इंग्रजी शिक्षणाची जोड देत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

शिक्षणाबरोबरच वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी समुपदेशन वर्गांचे आयोजन करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवांकुर पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करत नवउद्योजकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

सन २०१३ पासून सातत्याने सुरू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत FRANKFORD INTERNATIONAL UNIVERSITY, United States या संस्थेने ‘फिलान्थ्रॉपी’ (Philanthropy) क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ऑनररी डॉक्टरेट प्रदान केली. दि. ६ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या पदवीग्रहण समारंभात देशभरातील मान्यवर आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

रावसाहेब पवार यांना प्राप्त झालेल्या या मानाच्या पदवीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *