बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी सौ.रोहिणीताई आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली ४०० कामगार मुंबईकडे रवाना

दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये देण्याची मागणी

राहुरी (वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे)

 – बांधकाम कामगारांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये द्यावेत, तसेच बंद झालेले कल्याणकारी योजनांचे लाभ तातडीने सुरू करावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ. रोहिणीताई शंकरराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी राहुरी येथून सुमारे ३०० ते ४०० बांधकाम कामगार मुंबईकडे रवाना झाले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना मिळणारे आर्थिक अर्थसहाय्य, आरोग्य विमा, मुलांच्या शिक्षणासाठीचे अर्थसहाय्य यांसह विविध योजनांचे लाभ बंद झाल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. हे लाभ पूर्ववत सुरू करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे.

कामगार नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते मुंबई वाहन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण, मुलांना शिष्यवृत्ती तसेच वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना कोणत्याही अटीशिवाय दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, अशा मागण्यांचाही यात समावेश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन सौ. रोहिणीताई आंबेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *