फक्त खोट्या कागदी घोड्यांवर खोटे श्रेय लाटाणाऱ्या विरोधकांना सागर तनपुरे यांचा सणसणीत टोला

​राहुरी प्रतिनिधी):

“ज्या विरोधकांना जनतेने गेल्या पाच वर्षांपासून त्यांची जागा दाखवत घरी बसवले आहे, त्यांनी आता तरी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे. मल्हारवाडी रस्त्यासाठी कोणत्या प्रकारचा निधी मंजूर करून आणला आणि कोणत्या शासकीय आदेशावर काम सुरू झाले, हे विरोधकांनी आधी जनतेसमोर सिद्ध करून दाखवावे,” अशा कडक शब्दांत नगरसेवक सागर तनपुरे यांनी विरोधकांचा समाचार घेत जोरदार टोला लगावला आहे.

​परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या मल्हारवाडी रस्त्याचे काम माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि नगरसेवक सागर तनपुरे व प्रियंका आहेर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मात्र, या प्रत्यक्ष कामाचे श्रेय लाटण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या केविलवाण्या प्रयत्नांवर सागर तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सडकून टीका केली आहे.

विरोधकांच्या दाव्यांची चिरफाड करताना नगरसेवक सागर तनपुरे म्हणाले, “विरोधकांकडे स्वतःचे कोणतेही ठोस कर्तृत्व दाखवण्यासारखे राहिलेले नाही. जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवून पाच वर्षे घरी बसवले आहे. आता रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होताच, केवळ पोकळ पत्रे दाखवून आणि लोकांची दिशाभूल करून कामाचे श्रेय लाटण्याची नौटंकी विरोधक करत आहेत. जर या कामात विरोधकांचा काही संबंध असेल, तर त्यांनी या रस्त्यासाठी नेमका कोणता निधी मंजूर करून आणला, कोणत्या योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळवली, हे जाहीर करावे; अन्यथा जनतेची दिशाभूल करणे तात्काळ थांबवावे.”

मल्हारवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी आणि वाहनचालक वर्षानुवर्षे त्रस्त होते. या समस्येचे गांभीर्य ओळखून माजी राज्यमंत्री आ. प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. आ. तनपुरे यांनी प्रशासकीय पातळीवर विशेष लक्ष घालून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्ष कामाला गती दिली. आज रस्त्याचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असताना, विरोधक मात्र केवळ कागदी बाता मारून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

“राजकारण हे केवळ खोट्या प्रसिद्धीवर किंवा सोशल मीडियाच्या पोस्टवर चालत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काम करावे लागते. जनतेला कोण काम करते आणि कोण केवळ श्रेय लाटण्यासाठी पुढे येते, हे पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग बंद करावेत,” असा सणसणीत इशारा सागर तनपुरे यांनी दिला.

​दरम्यान, मल्हारवाडी रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, विरोधकांच्या खोट्या दाव्यांकडे दुर्लक्ष करत स्थानिक नागरिकांनी आ. प्राजक्तदादा तनपुरे आणि सागर तनपुरे यांच्या प्रत्यक्ष विकासकामांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *