मुळा प्रकल्पाच्या पाणीवापराचे सूक्ष्म नियोजन करा – जलसंपदामंत्री विखे पाटील

रब्बी हंगामात उजव्या कालव्याद्वारे एक, तर डाव्या कालव्याद्वारे दोन आवर्तने देण्याचे नियोजन

अहिल्यानगर : मुळा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे सूक्ष्म नियोजन करावे. पाणी वितरणात कार्यक्षमता वाढवून पाण्याचा अपव्यय टाळण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा, पाणीवापराचे नियोजन आणि कालव्यांद्वारे पाणी वितरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी शिल्लक पाण्याच्या नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानुसार, जानेवारी ते मार्च २०२७ या कालावधीत मुळा उजव्या कालव्यावरील बंधाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन, तर मुळा डाव्या कालव्याद्वारे दोन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग होणे आवश्यक असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पाणी वितरण प्रक्रियेत कार्यक्षमता राखून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त योग्य वापर होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठकीत अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे आणि कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी मुळा प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र, लाभक्षेत्रातील पर्जन्यमान, सन २०२६-२७ मधील खरीप हंगामातील पाणीवापर आणि आगामी रब्बी हंगामातील पाणी नियोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, विठ्ठल लंघे, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *