विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी हेल्पलाईन सुरू करणार – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
प्रवरानगर : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. मात्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी वैद्यकीय सेवेत मानवी मूल्ये, सहानुभूती आणि सेवाभावाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कर्करोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांनी केले. प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय अहवालामागे एक मानवी जीवन आणि त्याच्या कुटुंबाचे भविष्य दडलेले असते. त्यामुळे रुग्णाची जीवनकहाणी समजून घेत सेवाभावी वृत्तीने काम करा, असा संदेशही त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिला.
पद्मश्री डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या २३ व्या बॅचमधील विद्यार्थ्यांसह नव्याने स्थापन झालेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठाच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात डॉ. नोरी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वैयक्तिक उपचार शक्य
वैद्यकीय क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना डॉ. नोरी म्हणाले की, आधुनिक वैद्यकीय सेवेत संगणकीय तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि मानवी करुणा यांचा समन्वय आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनुकीय माहितीच्या विश्लेषणामुळे भविष्यात रुग्णाची जैविक वैशिष्ट्ये, जीवनशैली तसेच सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिक अचूक आणि वैयक्तिक स्वरूपाचे उपचार करणे शक्य होणार आहे.
मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत नैतिक मूल्ये आणि सहानुभूती जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा केवळ मोठ्या रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता, जिथे आरोग्यसेवेची खरी गरज आहे, तिथेही डॉक्टरांनी तत्परतेने सेवा द्यावी. प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात, या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना निःस्वार्थ सेवेचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी हेल्पलाईन सुरू करणार
जलसंपदामंत्री तथा डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ संस्थेसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. राज्यातील पहिल्या खासगी ग्रामीण विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा हा महत्त्वाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाने २३ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, विद्यापीठ स्थापनेचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले. या संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता फाउंडेशनच्या परिवाराचा भाग झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
विद्यापीठाला देशात अग्रस्थानी नेण्याचा विश्वास
पद्मभूषण डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून फाउंडेशन आणि नव्याने स्थापन झालेले विद्यापीठ देशात अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. शिर्डीच्या साईबाबांचा आध्यात्मिक संदेश न्यूयॉर्कपर्यंत पोहोचविण्यात आणि तेथे साईमंदिर उभारण्यात डॉ. नोरी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नोरी यांनी भारताशी असलेले आपले नाते आणि विखे पाटील फाउंडेशनच्या कर्करोग रुग्णालयातून जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. शिर्डीच्या साईबाबांवरील श्रद्धा हा आपल्या कार्याचा नैतिक दिशादर्शक असल्याचे सांगत निःस्वार्थ सेवा, नम्रता आणि सर्व जीवांप्रती प्रेम हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.