राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे, ता. १६ : जलजीवन मिशन योजनेतील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात तसेच ग्रामीण भागात तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवार, दि. २२ जून रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाच्या संयोजकांनी दिली.
या आंदोलनाबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. अमित पवार, गटविकास अधिकारी तायडे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत जयभाये यांना सादर करण्यात आले. यावेळी विविध गावांतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौठेवाडी, चिंचाळा, वरशिदे, सात्रळ, बुळे पठार आणि कोळेवाडी येथील पाणीटंचाई व जलजीवन मिशनच्या कामांबाबत उपअभियंता जयभाये यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. स्थानिक स्तरावरील प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
संयोजकांनी निवेदनात राज्यातील सुमारे २५ हजार जलजीवन मिशन योजना अपूर्ण असल्याचा दावा केला. या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याऐवजी इतर प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. जलजीवन मिशनच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असून ही योजना ‘मिशन’ नसून ‘कमिशन’ योजना बनल्याची टीका त्यांनी केली.
मान्सूनला विलंब झाल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असून शासनाने याबाबत पुरेशी पूर्वतयारी केली नसल्याचा आरोपही करण्यात आला. संविधानाने नागरिकांना दिलेला पिण्याच्या पाण्याचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांविरोधात २२ जूनच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
निवेदन सादर करताना देवराम जाधव, कैलास बुळे, निखिल जाधव, वर्षा बाचकर, संदीप कोकाटे, पंकज पलघडमल, सुभाष नंदकर, आदित्य साळवे, युवराज मधे, किसन काळे, विवेक तळपे, बंडू वायळ, उस्मान शेख, सचिन विधाते, खेमा काळे, मधुकर विधाते, सोमा काळे, मुरलीधर काळे आदी उपस्थित होते.