बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील वायर चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी ताब्यात, १० हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर, दि. १५ जून – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या दोन संशयितांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेत १० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर जप्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील वायर चोरीच्या प्रकाराला आळा बसण्यास मदत झाली आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून इलेक्ट्रिक वायर चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

पोलीस निरीक्षक बालाजी वेद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान मनोज पवार (वय ३१, रा. संजय नगर, कोपरगाव) आणि ऋतिक सुनील पवार (वय २०, रा. सोनेवाडी, ता. जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार संजीवनी नेटके करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्कादम सुंदरम, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दत्तात्रय टिपरेस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *