राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राहुरी येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रकाश रावसाहेब पवार यांना नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात ‘अटल भारत गौरव सन्मान २०२६’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अवॉर्ड्स ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने ६ जून रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पवार यांनी गेल्या १५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला. नियमित रक्तदान शिबिरे, महिलांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती व समुपदेशन, शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे तसेच गरजूंना मोफत औषधवाटप असे विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी मराठी माध्यमातील सेमी-इंग्रजी शाळा सुरू केली. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या या शाळेत सध्या सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे सुमारे ६० ते ७० कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळाल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रीय सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. पवार यांनी हा पुरस्कार आपल्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना समर्पित केला. हा सन्मान अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असून समाजसेवेची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रकाश पवार यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान राहुरीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.