राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे,30: राहुरी शहरातील गणपती घाट स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या महिलांना कपडे बदलण्यासाठी बंदिस्त खोली उपलब्ध करून द्यावी, तसेच नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुनील ठकाजी पवार यांनी केली आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. २९) त्यांनी राहुरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्या पाटील आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गणपती घाट स्मशानभूमीत अंत्यविधीच्या धार्मिक विधीनंतर स्नान करणाऱ्या महिला भगिनींना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना उघड्यावर कपडे बदलण्याची वेळ येते. महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेता स्मशानभूमी परिसरात बंदिस्त खोलीची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
तसेच, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावली जातात. त्यामुळे परिसरात वाहतुकीसह नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी नगर परिषदेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागण्यांची पूर्तता न झाल्यास महिला व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर सुनील ठकाजी पवार, संतोष जगधने, अरुण साळवे, सचिन मेहेत्रे, सतीश फुलसौंदर, अमोल काशीद, शुभम नारद आदींच्या सह्या आहेत.