५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग; योजनेतील सातत्य हे केंद्र सरकारचे यश – पालकमंत्री विखे पाटील
अहिल्यानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली किसान सन्मान योजना ऐतिहासिक ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४४ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १०८ कोटी ९५ लाख २४ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या या योजनेची सातत्यपूर्ण अंमलबजावणी हे केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेचा २४ वा हप्ता गुरुवारी (३० ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये, तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये मिळत असल्याने पेरणीसह शेतीच्या विविध कामांसाठी शेतकऱ्यांना या निधीचा उपयोग होत आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासादायक ठरत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
या योजनेचे यापूर्वीचे २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, आता २४ व्या हप्त्याचाही लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून, त्यांची अंमलबजावणी अखंडितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. योजनांमधील सातत्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी
जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थ्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील ५८ हजार ५७६ शेतकऱ्यांना ११ कोटी ७१ लाख रुपये, नेवासा तालुक्यातील ५३ हजार ५३१ शेतकऱ्यांना १० कोटी ७० लाख रुपये, श्रीगोंदा तालुक्यातील ५० हजार ४४७ शेतकऱ्यांना १० कोटी ८९ लाख रुपये, तर पारनेर तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांना १० कोटी रुपये मिळाले आहेत.
कर्जत तालुक्यातील ४३ हजार ५३९ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख रुपये, शेवगावमधील ४२ हजार ३८१ शेतकऱ्यांना ८ कोटी ४७ लाख रुपये, पाथर्डीतील ३९ हजार ८५३ शेतकऱ्यांना ७ कोटी ९७ लाख रुपये, तर राहुरी तालुक्यातील ३८ हजार १९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी ६३ लाख रुपये वर्ग झाले आहेत.
अकोले तालुक्यातील ३४ हजार ५०८ शेतकऱ्यांना ६ कोटी ९० लाख रुपये, अहिल्यानगर तालुक्यातील ३० हजार ५५७ शेतकऱ्यांना ६ कोटी १२ लाख रुपये, जामखेडमधील २९ हजार ९४६ शेतकऱ्यांना ५ कोटी ९८ लाख रुपये, कोपरगावमधील २७ हजार ६५ शेतकऱ्यांना ५ कोटी ४१ लाख रुपये, राहाता तालुक्यातील २३ हजार ८७२ शेतकऱ्यांना ४ कोटी ७७ लाख रुपये आणि श्रीरामपूर तालुक्यातील २२ हजार २३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४४ लाख रुपये मिळाले आहेत.