श्रीरामपुरात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह दोघांना अटक

श्रीरामपूर, ता. १७ : अपर पोलिस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीतून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, धारदार चॉपर व मोबाईल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्रीरामपूर शहर हद्दीतील जर्मन हॉस्पिटलसमोरील पाण्याच्या पाटाजवळ दोन संशयित व्यक्ती शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता नाझीम अन्वर पठाण (वय २५, रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) व मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल (वय १८, रा. महात्मा फुले नगर, टाकळीभान रोड, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली.

तपासणीदरम्यान नाझीम पठाण याच्याकडून काळ्या रंगाचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. तर मोहम्मद पटेल याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, धारदार चॉपर व मोबाईल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात येणार होता, तसेच ती कुणाकडून मिळविण्यात आली याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ (६)(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेव हंडाळ तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *