सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त

श्रीरामपूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून पुण्यातील वाघोली येथून गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मशीनची संख्या सहावर पोहोचली आहे.

अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक डॉक्टर, मेडिकल चालक आणि एजंट यांचा या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून या गैरप्रकारांचे जाळे विविध जिल्ह्यांपर्यंत पसरल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात नुकतेच अटक करण्यात आलेले डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. वाघोली, पुणे) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी वैद्यकीय साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिस पथकाने डॉ. जाधव यांना सोबत घेऊन वाघोली येथे तपास केला असता संबंधित सोनोग्राफी मशीन मिळून आले. हे मशीन जप्त करण्यात आले असून त्याच्या सहाय्याने वाघोली परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुढील तपासाचा केंद्रबिंदू अवैध गर्भपात करणारे संशयित, संबंधित डॉक्टर आणि एजंट यांच्याकडे वळविण्यात आला असून पोलिसांकडून बारकाईने चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सात डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या पुरवठादाराचा समावेश आहे. तसेच विविध जिल्ह्यांतून सहा सोनोग्राफी मशीन, चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भारती आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *