मोदींच्या नेतृत्वाने भारताची मान उंचावली : आमदार अक्षय कर्डिले

पाथर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथे भाजपाच्या वतीने तपपूर्ती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आमदार कर्डिले म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताला जागतिक पटलावर नवी ओळख मिळाली असून देशाची प्रतिमा अधिक भक्कम आणि प्रभावी झाली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या विविध विकासाभिमुख आणि कल्याणकारी योजनांमुळे देशाला प्रगतीची नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

तपपूर्ती कार्यक्रमानिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिरात आमदार कर्डिले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लोहसर गाव परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकी जपली. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास माजी सभापती संभाजी पालवे, भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, सरपंच अनिल गीते पाटील, माजी सरपंच सुनील साखरे, सुरेश चव्हाण, धीरज मैड, गणेश पालवे, किरण गर्जे, भैया बोरुडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *