गर्भलिंग निदानाच्या अवैध साखळीचा पर्दाफाश; सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची आणखी एक मोठी कारवाई

लोणी : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी मोठे यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील डॉक्टर व मेडिकल चालकाला अटक करण्यात आली असून श्रीगोंदा तालुक्यातील फरार मेडिकल चालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून आणखी एक सोनोग्राफी मशीन आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १९ वर पोहोचली असून त्यामध्ये सहा डॉक्टरांचा समावेश आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन व अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती.त्यानंतर तपासाचा विस्तार करताना ढगे नावाच्या आरोपीकडून आणखी एक मशीन जप्त करण्यात आले. पुढे श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांनाही गर्भलिंग निदान चाचण्या व अवैध गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली. तपासादरम्यान पुण्यातील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्रेत्यालाही अटक करण्यात आली होती.या आरोपींकडून झालेल्या चौकशीत निफाड तालुक्यातील डॉक्टर कुणाल वलटे यांनीही अवैधरीत्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस पथकाने डॉक्टर वलटे आणि मेडिकल चालक सागर उन्हाळ यांना ताब्यात घेऊन अटक केली.दरम्यान, पुण्यातील वैद्यकीय साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्या चौकशीतून जालिंदर रामदास बोरुडे (रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) याचे नाव समोर आले होते. गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार असलेला बोरुडे अटक टाळण्यासाठी शेतातील झोपडीत लपून बसल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे व विशेष पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.बोरुडे याच्याकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन तसेच क्रेटा कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलिस कॉन्स्टेबल महादेव कोहक आणि संदीप राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून पाच सोनोग्राफी मशीन आणि चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मते, या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भारती आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *