भट्टड यांचा ट्रक व ३०.३९ लाखांचा माल एलसीबीने शोधला

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : विश्वासाने चालकाकडे सुपूर्द केलेला ट्रक व त्यामधील महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे अपहाराच्या उद्देशाने अन्यत्र नेल्याची घटना उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत ३० लाख ३९ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत प्रदीप शिवनारायण भट्टड रा. स्वस्तिक चौक, प्रगती शाळेजवळ, राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे भाऊ सुनील भट्टड यांच्या मालकीचा आयशर कंपनीचा ट्रक एमएच १२ व्हीएफ ६९११ चालक जयसिंग मुक्ताजी भगत रा. खानापूर, ता. जुन्नर, जि. पुणे याच्याकडे विश्वासाने सोपविण्यात आला होता. मात्र, चालकाने ट्रक मालासह नियोजित ठिकाणी न नेता अन्यत्र नेल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीजराजा आतार व विशाल तनपुरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील मार्केट यार्डमध्ये संबंधित ट्रक उभा असल्याचे समजताच पथकाने तेथे धाव घेतली.

या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक व १५ लाख ३९ हजार ६४८ रुपये किमतीचे महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे असा एकूण ३० लाख ३९ हजार ६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *