रेल्वे साहित्य चोरीचा पर्दाफाश; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी (प्रतिनिधी) – रेल्वे मालमत्ता चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत रेल्वे पोलिसांनी सुमारे ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली असून या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भारतीय रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान तसेच रेल्वे वाहतूक सुरक्षेवरील संभाव्य धोका टळल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरपीएफ अहिल्यानगरचे निरीक्षक बेनीप्रसाद मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ क्राईम ब्रांच सब युनिट दौंडचे पीएसआय एकनाथ गडधे, मुख्य आरक्षक रामनाथ केकान, कॉन्स्टेबल धनंजय यादव तसेच आरक्षक दीपक कर्डीले, विशाल पायघन आणि गुलाब येवले यांच्या पथकाने दौंड हायवेवरील खडकी–चिखली गावांच्या दरम्यान असलेल्या परिसरात सापळा रचून दोन संशयित वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान रेल्वेच्या सिग्नल विभागातील महत्त्वाची सामग्री बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. यावेळी सागर अशोक नवसारे (रा. मुळानगर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), नितीन शंकर भालसिंग (रा. वाळकी, जि. अहिल्यानगर) आणि अमोल चंद्रभान पेरणे (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये सुमारे ३.५ किलोमीटर लांबीची १२ कोर सिग्नलिंग केबल, ६०० मीटर ६ कोर सिग्नलिंग केबल, सुमारे १ किलोमीटर मिश्रित १२ व ६ कोर केबल, ३९ मीटर जी.आय. पाइप, एक आर.एस. प्रकारची पॉइंट मशीन तसेच १५० किलो जी.एस. वायरचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत ११ लाख ८ हजार ९१२ रुपये इतकी असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्राथमिक चौकशीत संबंधित सिग्नल व दूरसंचार विभागाकडून ही सामग्री हलविण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी अथवा सूचना देण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित विभागाने रेल्वे मालमत्ता चोरी झाल्याबाबत अधिकृत अहवाल सादर केला.

पुढील तपासादरम्यान निरीक्षक बेनीप्रसाद मीणा, पीएसआय एकनाथ गडधे, मुख्य आरक्षक रामनाथ केकान आणि कॉन्स्टेबल धनंजय यादव यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील चौथा आरोपी हरिराम चेतराम रायकवार (वायरमन/डेपो इंचार्ज, मूळ रा. हरदुवा मानगड, जि. दमोह, मध्य प्रदेश) याचा सहभाग उघडकीस आणला. त्याला विशापूर येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. अशा प्रकारे या गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

या कारवाईच्या आधारे रेल्वे पोलिस ठाणे, दौंड येथे रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) अधिनियमातील कलम ३(अ) तसेच रेल्वे अधिनियम कलम १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून रेल्वे मालमत्ता चोरीच्या साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईमुळे चोरीस गेलेली संपूर्ण रेल्वे मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले असून “ऑपरेशन रेल सुरक्षा” अंतर्गत ही कारवाई उल्लेखनीय मानली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता, त्वरित निर्णयक्षमता आणि व्यावसायिक कौशल्यामुळे रेल्वे मालमत्ता चोरीच्या महत्त्वाच्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा होऊन शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *