भट्टड यांचा 32.50 लाखांच्या माल अपहाराचा आरोप; चालकाविरोधात गुन्हा

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –

भाडेतत्त्वावर  चालविण्यात येणाऱ्या ट्रकमधील सुमारे 32 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोयाबीन व खाद्यतेलाचा माल परस्पर घेऊन गेल्याप्रकरणी चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रदीप शिवाजीराव भट्टड  (वय 53, रा. राहुरी) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या आयशर कंपनीच्या MH-12-VF-6911 या ट्रकवर चालक म्हणून जयसिंग मुक्ताजी भगत (रा. खानापूर जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे) कामाला ठेवले होते.

फिर्यादीनुसार, 29 मे रोजी श्रीरामपूर येथील गजानन रोडवेज ट्रान्सपोर्टमधून 15 टन सोयाबीन भरून ट्रक पुणे येथील मार्केट यार्डात पाठविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा श्रीरामपूर येथे परत येऊन ट्रकमध्ये सुमारे 600 बॅग खाद्यतेलाचे डबे भरून ते पुण्याकडे रवाना करण्यात आले.

मात्र, चालकाने माल नियोजित ठिकाणी न पोहोचविता ट्रकसह परस्पर नेल्याचे निदर्शनास आले. ट्रकमधील 17.50 लाख रुपये किमतीचे 15 टन सोयाबीन आणि 15 लाख रुपये किमतीच्या 600 बॅग खाद्यतेलाचा असा एकूण 32.50 लाख रुपयांचा माल अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी चालक जयसिंग मुक्ताजी भगत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *