राहुरी-नेवासात अन्न भेसळविरोधी कारवाई; २.८४ लाखांचा संशयित माल जप्त

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे.

राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या गुलकंद व अमेरिकन नट्स फ्लेव्हर आईस्क्रीमचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याचा संशय आल्याने ४१ हजार ४४० रुपये किमतीची १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आली.

तर नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. संशयित आढळलेल्या २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीच्या १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यात नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *