श्रीरामपूर, दि. २५ (प्रतिनिधी) : घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अकोले पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ११ मार्च रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील श्यामनगर पाट परिसरात फिर्यादी महिलेच्या घरात अज्ञात पाच इसमांनी जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील फिर्यादी, तिचे पती व सासू यांना मारहाण करून आरोपींनी घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐवज लंपास केला होता.या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यानुसार सुरेगाव (ता. श्रीगोंदा) येथे सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बब्या पिंट्या काळे (वय २२), शुभम पिंट्या काळे (वय २०) आणि रवी लाला भोसलें (वय ४०, सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे 23 मार्च 2026 रोजी देखील या आरोपींनी दरोडा घालत कुटुंबियांना मारहाण करून लूट केली होती याबाबत दिंडोरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बोरसे, पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संदीप दरंदले, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.कॉ. अशोक गाढे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पो.स.ई. विनोद खांडबहाले, पो.हे.कॉ. रविंद्र वाघचौरे, पो.कॉ. अविनाश गोडगे, पो.कॉ. सुहास गोरे, पो.कॉ. मनोहर मोरे यांनी केली आहे पुढील तपास अकोले पोलिस करत आहेत.