राहुरी : देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील कराळे यांनी हे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, देवळाली प्रवरा परिसरासाठी १९९० साली पोलीस ठाण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र विविध कारणांमुळे ते आजतागायत कार्यान्वित झालेले नाही. दरम्यान, नव्या सरकारच्या काळात जिल्ह्यात नव्याने काही पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये देवळाली प्रवरा याचाही समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा प्रस्तावित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३२ गावे येत असून, नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वाढती लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.याशिवाय, प्रस्तावित पोलीस ठाण्यासाठी आवश्यक जागा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास स्थानिक स्तरावरून तयारी दर्शविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाणे सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.