नवोदित मतदार नोंदणीला प्राधान्य द्या – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे

राहुरी | दि. ६ ऑक्टोबर
लोकशाही व्यवस्थेत युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र युवक-युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अहिल्यानगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले.
राहुरी येथील लोकनेते रामदास धुमाळ पाटील महाविद्यालयात आयोजित मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. नवोदित मतदारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि मतदार यादीतील नावाची पडताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पात्र विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात नमुना क्रमांक ६ भरून घेत मतदार नोंदणीचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
विशेष म्हणजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयात अधिकारी म्हणून परत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा अनुभव विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी वेळेत पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि निवडणूक यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. नवनाथ दळवी, तहसीलदार डॉ. अमित पवार, निवडणूक नायब तहसीलदार विशाल सदनापूर, अनिल बडे, प्राध्यापक अनिरुद्ध जाधव, महसूल कर्मचारी अनिल टेमक, अभिजित रायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *