पालखेड कालवा दुरुस्तीसाठी एक कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर
शिर्डी दि.३ – टंचाई परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा विभाग,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने कामकाज करावे ,सुविधा उपलब्ध करून देण्यात केलेला निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कोपरगाव येथे कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये कोपरगाव तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अपर जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे. कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संदान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नकडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कोपरगाव तहसीलदार महेश सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल वाळुंज यांच्यासह तालुकास्तरीय जलसंधारण ,पाणीपुरवठा महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी , विविध गावातील शेतकरी या बैठकीस उपस्थित होते.
दुष्काळाची परिस्थिती पाहता ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी पाणी, पशुधनासाठी चारा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करत असताना प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करावे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात केलेला निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. निष्काळजीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीरपणे उभे असून दुष्काळाच्या परिस्थितीत झालेल्या शेतीचे नुकसानाचे पंचनामे करताना तांत्रिक नोंदी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एनडीआरएफ आणि राज्य मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना दुष्काळ परिस्थितीमध्ये मदत आणि सहकार्य देण्यासाठी तहसील कार्यालयमध्ये हेल्पलाइन सुरू करण्याचे यावेळी त्यांनी सूचित केले .
पालखेड कालवाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .पिकासाठी पाण्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन केले असून डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यात दोन आवर्तनाद्वारे पाणी शेतीला दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आतापर्यंत थकीत शेतकऱ्याकडे असलेली पाणीपट्टी तूर्तास वसूल केली जाणार नसून यापुढे पाणीपट्टीची मागणी करण्यात येऊ नये असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गाव परिसरात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली असल्याने याबाबत वनविभागाने पिंजरे लावून याचा प्रतिबंध करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले .
शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी डीपी आणि ट्रांसफार्मरसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर हे ट्रान्सफॉर्म कार्यान्वित करून वीज भारनियमानाचा कालावधी कमी करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले .
विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे यांनी पीक कापणी प्रयोग यामध्ये जास्तीत जास्त प्रत्यक्ष एक कापणी प्रयोगाची नोंद पंचनामा मध्ये करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. तसेच ६३ गावात रब्बीसाठी पाणी आवर्तनाचे तीन आवर्तन देण्याबाबतची मागणी केली. धोंडेवाडी , वेस या गावातील पोटखराब क्षेत्राची नोंद करण्यासाठी महसूल विभागाने पाहणी करण्याबाबतही सूचना केली. शेतकऱ्यांना मोफत चारा पिकाचे बियाणे वाटप केले जावे. उजवा आणि डावा कालव्यातून पाण्याचे समान पद्धतीने विसर्ग करावा. रोजगार हमीचे काम उपलब्ध करून देण्यासाठी सूचना त्यांनी प्रशासनाकडे त्यांनी केली.
आमदार आशुतोष काळे यांनी दुष्काळ परिस्थितीची जाणीव ठेवून चाऱ्याची परिस्थिती विचारात घ्यावी तसेच यामध्ये जिल्हा नियोजनच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली.
आढावा बैठकीपूर्वी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावातील दुष्काळ शेतातील पिकांची पाहणी जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
त्याच्या समवेत आमदार अशितोष काळे, नितीन दिनकर यांच्या सह पदाधिकारी,अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.