दुष्काळमुक्तीसाठी कुकडीच्या आवर्तनाचा विचार : विखे पाटील

जामखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी
जामखेड, दि. १ :
टंचाईच्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशीलतेने काम करावे. नियम-कायद्यांची अडचण सांगून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, जामखेड तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णयांची कार्यवाही सुरू आहे. कुकडी धरण समूहातील पाण्याचा लाभ आवर्तनाच्या माध्यमातून देण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा मंत्री विखे पाटील यांनी गुरुवारी आढावा घेतला. अरणगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
कर्जत-जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागातील प्रश्नांवर सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार सुनील कर्जतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा प्रांजली चिंतामणी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महावितरणचे रमेश पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतले आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच जनावरांसाठी चारा व पाण्याला प्राधान्य द्यावे. तालुक्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने संयुक्त नियोजन करावे, अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या.
नुकसानग्रस्त सर्व पिकांचे पंचनामे करावेत. परिस्थिती गंभीर झाल्यास मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. टँकर नियोजनाच्या वेळी ग्रामसेवक व तलाठ्यांची उपस्थिती सक्तीची करावी. प्रत्येक विभागातील अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. बैठकीत चुकीची माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जनतेत रोष निर्माण होऊ देऊ नका; अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कवडगाव, चौंडी व जवळा येथील कोल्हापूर बंधाऱ्यांची कामे, मोहरी तलावाचा सांडवा तसेच कुकडी कालव्यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
सभापती राम शिंदे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पीकविमा, वीज आणि जलजीवन मिशनच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सुनील कर्जतकर यांनीही यावेळी विविध सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *