शिर्डी पोलिसांची दमदार कारवाई; 18.34 लाखांचे 55 मोबाईल जप्त

शिर्डी : शिर्डी पोलिसांनी संशयास्पद हालचालींच्या आधारे कारवाई करत नामांकित कंपन्यांचे तब्बल 55 मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 18 लाख 34 हजार रुपये आहे. हे मोबाईल अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीतून चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

29 सप्टेंबरच्या रात्री शिर्डी परिसरात पोलिसांचे गस्ती पथक मालाविरुद्धच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दत्तनगर परिसरात झारखंड येथून काही दिवसांपूर्वी आलेल्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित घराची पाहणी करण्यासाठी धाव घेतली.

पोलिस आल्याचे लक्षात येताच घरातील दोन जण मागील दरवाजातून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला; मात्र ते मिळून आले नाहीत. त्यानंतर पंचांसमक्ष घराची पाहणी केली असता तेथे एक बॅग आढळून आली. या बॅगेत नामांकित कंपन्यांचे 55 मोबाईल आढळले.

पोलिसांनी 18 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 861/2026 अन्वये महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 122 व 124 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ लांडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *